
tarunbharat.com · Feb 17, 2026 · Collected from GDELT
Published: 20260217T111500Z
मुरगाववासीयांचा राजधानीत आक्रोश : कोळसा हाताळणी बंद करण्याची मागणी पणजी : स्थानिकांच्या म्हणण्याचा विचार न करता मुरगावात राजरोसपणे कोळसा हाताळणी सुरूच आहे. आमच्या नातेवाईकांचा जीव कोळसा प्रदूषणामुळे जात आहे, याचा आतातरी सरकारने विचार करावा, असा आक्रोश काल, सोमवारी पणजीतील आझाद मैदानावर मुरगाववासियांनी पत्रकार परिषदेद्वारे केला. आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुरगाववासीय सर्वेश होबळे, सचिन भगत, शिवप्रसाद महाले, शंकर पोळजी तसेच माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर यांनी मुरगावातून कायमचीच कोळसा हाताळणी बंद करावी, अशी जोरदार मागणी केली. मुरगावचे ग्रामस्थ सर्वेश होबळे म्हणाले, कोळसा प्रदूषणामुळे माझ्या आईचे निधन झाले. त्यानंतर पाठोपाठ भावाचेही फुफ्फुसात कोळशाचे घटक आढळल्याने निधन झाले. आपण जवळच्या नातेवाईकांना या कोळसाच्या हाताळणीमुळे गमावले आहे, याला जबाबदार कुणाला धरावे? आम्ही रोजच कोळसा प्रदूषणाचा त्रास सोसत आहोत. तरीही पूर्वीचे स्थानिक आमदार मिलिंद नाईक यांच्यापुढेही आम्ही निदर्शने करून कोळसा हाताळणी बंद करावी, अशी मागणी केली. त्यानंतर याचे राजकारण करीत हे प्रदूषण कायमचे बंद करण्यासाठी आपणास एकदा संधी द्यावी, त्यानंतर आपण मुरगाववासियांना कोळसा प्रदूषणातून मुक्त करतो, असे आश्वासन संकल्प आमोणकर यांनी दिले. निवडून आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र आता कोळसा प्रदूषण हटविण्यासाठी सक्षम कार्यवाही त्यांच्याकडून होताना दिसत नाही, असा आरोपही त्यांनी केला. शंकर पोळजी म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून मुरगावात कोळसा प्रदूषणाच्या छायेखाली स्थानिक जगत आहेत. त्यावेळीही मिलिंद नाईक यांच्याकडेही अनेकदा कोळसा हाताळणी पूर्णपणे थांबवावी अशी मागणी केली. परंतु दुर्लक्ष केल्याने कोळसा प्रदूषणाचा मुख्य मुद्दा बनवून संकल्प आमोणकर यांनी निवडणूक जिंकली. परंतु आता ते सरकारात असतानाही कोळसा हाताळणी पूर्णपणे बंद करण्यास असमर्थ ठरल्यानेच आम्हाला रस्त्यावर आणि तेही राजधानीत यावे लागत असल्याचे सांगितले. आपल्या आईलाही कोळसा प्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका आला असल्याचे पोळजी यांनी सांगितले. कोळसा प्रदूषणावर राजकारण न करता प्रत्यक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरांची पाहणी करून ही हाताळणी बंद करावी, की लोकांच्या जीवनाशी खेळावे, याचा निर्णय घ्यावा. आम्हाला कोळसा हाताळणी कायमची बंद हवी आहे, त्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. कोळसा हाताळणीचा होणारा त्रास आणि त्यावर उपाय म्हणून कोळसा हाताळणी कायमची बंद करावी, अशी मागणी मुरगाववासीय गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ करीत आलेले आहेत. तरीही यावरून माजी आमदार मिलिंद नाईक आणि विद्यमान आमदार संकल्प आमोणकर हे सरकारात असूनही केवळ राजकारण करीत आहेत. हा विषय राजकारणाचा नसून, लोकांच्या जीवन-मरणाचा आहे, त्यासाठी आतातरी सरकारने जागे होऊन कोळसा हाताळणी बंद करावी, असे माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर यांनी सांगितले. Tarun Bharat Portal Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.